
कर्जत / प्रतिनिधी :
ग्रामपंचायत निवडणुकांचा अधिकृत बिगूल वाजला असून नवीन वर्षाआधीच नवे कारभारी मिळणार आहे. तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींसाठी सर्वच राजकीय नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पक्षीय पातळीवर या निवडणुका होत नसल्या तरी स्थानिक नेत्यांवर पक्षाचा शिक्का असतो. पर्यायाने त्याच पक्षाची ग्रामपंचायतीवर पकड़ म्हणजेच सत्ता मानली जाते. त्यामुळे प्रमुख नेतेही या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असतात. दरम्यान, या निवडणुकांमुळे गावगाड्याच्या अर्थकारणालाही मोठा हातभार लागणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका या भाऊबंदकी व वाड्यांमध्ये रंगतात. शिवाय एकाच पक्षाचे दोन गट आमने-सामने उभे ठाकतात. त्यामुळे आपसूकच निवडणूक प्रतिष्ठेची होते आणि लाखो रुपयांची उधळण होते. यावर्षी अतिपाऊस यामुळे मोठे नुकसान झाले. मजूर मतदारांसाठी निवडणूक ही मोठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा भाव वधारणार आहे. मतदारांची मर्जी राखण्यासाठी गावपुढारी प्रसंगी कर्ज काढेल; पण एकही मतदार नाराज होता कामा नये आहेत. तसेच निवडणूक धुराळ्यात ग्रामीण भागात जेवणावळी आणि चहा, दुकाने, हॉटेल, उपाहारगृहांना झळाळी मिळू शकेल. अखेरच्याटप्प्यातील आर्थिक उलाढालीही लक्षवेधी असतील. एकूणच, ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रत्येक निवडणूक शिवसेनेसोबत (शिंदे गट) एकत्र लढणार असल्याचे भाजपाने यापूर्वीच जाहीर केले असले तरी ग्रामपंचायत याला अपवाद ठरू शकते, दरम्यान भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस नेते तसेच आमदार समर्थकांच्या पॅनलमध्ये जमवाजमव सुरू झाली आहे .
स्थलांतरित मतदारांची हमखास गावभेट
मिनी मंत्रालय म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. वॉर्डनिहाय अतिशय कमी मतदान असल्याने प्रत्येक मतदार निवडणुकीसाठी महत्त्वाचा असतो. सध्या हजारो मतदार रोजीरोटीसाठी बाहेरगावी आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरित झाले असले तरी त्यांची गावातील मतदारयादीत नावे आहेत. त्यामुळे अन्य निवडणुकांच्या मतदानाकडे पाठ फिरविणारा हा मतदारराजा गावकी भावकीसाठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हमखास गावी येतो. त्यांना आणण्यासाठी स्वतः उमेदवारांकडून व्यवस्था केली जाते.
खरी चुरस भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच
ग्रामीण भागावर आपली पकड़ मजबूत करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. खरी लढत भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच मानली जात आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना कशी आश्वासने द्यावयाची आणि दिली तर ती पूर्ण कशी करावयाची, या विवंचनेत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत.