ब्रेकिंग
तहान भागवणाऱ्या पाणपोई झाल्या गायब संस्था, संघटनांचा सेवाभावाचा आटला झरा

कर्जत / सुभाष माळवे :
उन्हाळ्याची चाहूल लागली की, पूर्वी कर्जत शहराच्या चौकाचौकांत पाणपोया दिसत होत्या. उन्हाचा पारा जसजसा वाढायचा तसतशी या पाणपोयांवर वर्दळही दृष्टीस पडायची, मात्र आता शोधूनही पाणपोई सापडत नाही. त्यामुळे सेवाभावाचा झरा आटला की काय, असा प्रश्न पडला आहे.
पूर्वी ढिगाने काम करणाऱ्या संस्था, संघटना, राजकीय संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे येत होत्या. पाणपोईसाठी उन्हाळ्याच्या आधीपासूनच नियोजन केले जात होते. शिवाय काही संवेदनशील नागरिकदेखील स्वतःच्या घरासमोरील जागा पाणपोईसाठी उपलब्ध करून देत होते. नागरिकांची तहान भागवण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवा भावातून हे काम केले जात होते.
सर्वांना दृष्टीस पडेल अशा जागी मंडप उभारून तिथे पाणपोई सुरू करण्यात येत होती. आज मात्र दुर्दैवाने अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे. पाणपोईच्या ठिकाणी दररोज दोन रांजण भरून पाणी ठेवले जात होते. रस्त्याने फिरताना तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की, आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायची आणि नंतरच पुढचा मार्ग धरायची.
ग्रामीण भागातून शेकडो लोक विविध कामासाठी शहरात येतात, मात्र सध्या पाणपोई नसल्याने नागरिकांना वीस रुपये खर्चून पाणी प्यावे लागते. तरी सामाजिक संस्था, संघटना यांनी सामाजिक जाणिवेतून किमान मुख्य रस्त्यावर पाणपोई सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.