ब्रेकिंग
कर्जत राशीन मार्गावरील रस्त्याचे काम कासव गतीने; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा ठेकेदाराचे नाव मोठे, लक्षण खोटे

कर्जत राशीन मार्गावरील रस्त्याचे काम कासव गतीने; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
ठेकेदाराचे नाव मोठे, लक्षण खोटे
कर्जत. / सुभाष माळवे ःः
कर्जत – राशीन ते खेड या राज्य मार्गांवरील रस्त्याचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. सुरू असलेल्या या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तर अनेकाना आपला जिव कायमचा गमवावा लागला आहे.
गेली चार वर्षे या रस्त्याच्या नुसत्या साईटपट्ट्या , छोटे पुल व कर्जत शहरात सिमेंट कॅंक्रिंट रस्ता खुदाई करून रस्त्याचे काम सुरू केले असल्याचे नाटक केले जात आहे. टेंडर घेतलेल्या ठेकेदाराला बदलून नवीन ठेकेदाराकडे काम सोपवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर या मार्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा मार्ग दुर्लक्षित झाला असून येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी आंदोलन केली गेली. सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने सार्वजनिक बांधकामावर धडक मोर्चा काढून अधिकारी वर्गांना धारेवर धरले जात आहे. पाचशे मीटर अंतरावर काम गेल्या सात आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे रस्ता खोदून विनाकारण वाहतुकीची कोंडी निर्माण होईल असा प्रयत्न केला जात आहे. कर्जत राशीन खेड या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत.
कामाला कोट्यवधींचा निधी
गेली चार वर्ष या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्याच्या दुतर्फा खुदाई करून प्रवाशांना अडचणीत टाकले आहे. या कामाच्या ठेकेदाराचे नाव मोठे, आणि लक्षण खोटे असे या कामावरुन दिसून येते. रस्त्याच्या कामाला कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र या रस्त्याचे कामाची मुदत संपूनही ही वर्ष लोटले असतानाही काम पुर्ण झाले नाही हे विशेष.या रस्त्याचे काम मे महिन्याअखेर कामकाज पूर्ण होईल कि नाही….? असा प्रश्नही प्रवाशांतून व्यक्त होत आहे. साईटपट्टचाची स्वच्छता व पूर्ण रस्ता करण्याची गरज आहे. नसेल तर काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा काढला जाईल. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांनी दिली. चार वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली या मार्गावरील रस्त्यावर चिखल- मातीत वाहने घसरून अनेक छोटे मोठे अपघात झाले आणि प्रवासी जखमी झाले. अशा या मार्गाला केवळ दिखाऊ पणाचा आव न आणता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा.
ठेकेदाराचे पूर्ण दुर्लक्ष
कर्जत – राशीन व खेड या मार्गाकरिता शासनाने मोठा निधी दिला आहे. चार वर्षापूर्वी नूतनीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. पण याकडे ठेकेदाराने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या मार्गानेच बारामती , गोवा,पुणे हा भाग जोडला जातो. मराठवाडा नगर, नाशिक सह अनेक गावांतील लोक या मार्गाने प्रवास करत असतात. तरी या मार्गाकडे दुर्लक्ष का…? असा प्रश्न आता सर्व सामान्यातून विचारला जात आहे. सध्या या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्यातून प्रवास करताना दुचाकी प्रवाशांना धुळीचे कण डोळ्यात घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी या मार्गावरील रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून काम लवकर पूर्ण करून प्रवाशांना रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी व्यक्त होत आहे.